हंड्यावर हंडे ठेवले सात, पाण्याला जाताना शिजत घातला भात, पाणी शेंदता-शेंदता तोल की गेला, काय सांगू तुम्हाला धनीन हात दिला, माहेरच्या आठवणीनं डोळं डबडबले, खरं सांगते तुम्हाला धनीन डोळे पुसलं, सुंदर कर्तृत्ववान धनीचा मला वाटतो अभिमान…… चं नाव घेते तुमचा मान राखून किंवा ………नी दिले मला सौभाग्याचं दान.

सरसर जात होते, माडीवर पहात होते, खिडकी लागली मानेला, रुपये दिले पानाला, केशर चुना व कात, लवंगा मुठीत, वेलदोडे ओटीत ……. बसले दाटीत, कशी जाऊ पान सुपारी वाटीत.
इरुद्या, कोयऱ्या कूट जोडवी, पायी साखळ्याचंकडं, पायझुब्या दंडं, हाती पाटल्याचं फासं दाटले, हिरकणीला ५०० रु. आटलं, तांदळाचं मणी, सरपदर दोन्ही, थोरलं डोरलं, धाकलं डोरलं, थोरल्या डोरल्याला वाघनक्या,
वाघनकीला मोत्याचा घोस, सरीमाळचा बंदोबस्त चक्री बुगड्या, कुलुपी गेट, झुबं फुलाचं, मोडलं कोड, सरजाची नथ मला दंड, ठुशी गरसुळीचे गोंडं रेशमांनी आवळलं…….. नावाला चंद्र, सूर्य मावळलं.
हळदीकुंकू लेते सुवासिनीच्या मेळ्यात, गुलाबाचे फूल माळ्याच्या मळ्यात, नऊ तोळ्याचा हार, आत्याबाईच्या गळ्यात, आत्याबाईच्या पोटचे, भाऊजीच्या पाटचे, मुख्यमंत्र्याचे मित्र……… च्या जीवावर लेते मणी मंगळसूत्र.
काळी चोळी विणकर पुण्याची, ती होती बरी मी नव्हते घरी, चांदीचे कपाट, सोन्याचा हात, आत उघडून बघते जिऱ्या-साळीचा भात, भातावर तूप, तुपसारखं रूप, रुपासारखा जोडा, चंद्रभागेला पडला वेढा…….. चं नाव घेते वाट माझी सोडा.
झुल झुंबराचं, फुल उंबराचं, बोलणं पिंपळाचं, पोळी गव्हाची, बहीण भावाची, लेक कुणाची, आई-बापाची, सुन कुणाची, सासू-सासऱ्याची,राणी कुणाची, चतुर भ्रताराची, नाव कोण घेते……….बाईची लेक,
नाव कोण घेते बहीण……. ची नाव काय घेती…….. कोण हाय शहाणी………राणी.
माळ्याच्या मळ्यात गुलाबाचे फुल फुलते, नवरत्नाचा हार गळ्यात घालते, अंथरल्या छड्या, पितांबराच्या घड्या, पाच खिडक्या, रंगीत दार, तिथ खेळंत तान्हं बाळ, तान्ह्या बाळाची सुपारी, सुपारीला पैका……. चं नाव घेते सर्वजण ऐका.
कौलारु माडी, काचेचे आरसे लावा त्याला, हाजारांची पैठणी मला, त्यांना गुलाबी सदरा मुंबईहून पार्सल केला, घडीच्या चोळीला चाटी केला, कारलं, डोरलं वर सुवर्णाची सर वजरटिकी मोती चार, इरद्या कोयऱ्याला दिला इसार, त्याला इसाराची खूण दावा, चंद्रभागेला चलतात नावा, आधी आळंदीला जावा, मग शिंगणापूरला जावा, शिंगणापूर गेले, महादेवाचे दर्शन केले, आनंद झाला फार, जरीच्या पदराची हवा लागे गार, नसेल कुसूम पुरी जन्मले शिखर पार्वती लावा चंदन ज्योती, चंदन ज्योतीला तेल नव्हते घ्या पाणी, त्यांनी घेतल्या तुरी, आई पाडली, शाळा केली, पुरी माझी शाळा,
एच-एस-सी त्यांची शाळा, एच-एस-सी ला सुख,
बी-एस-सी ला दुःख, पुस्तकाला वास येतो गाईच्या खुराकाचा, वास येतो मधुर, तुम्ही घ्या पोथी, मी करते निवड, राम गेले वनवासाला, राज्य दिले भरता………नाव घेते तुमच्या सगळ्याकरिता.
आंबा मोहरला पानोपानी, त्याला लागल्या कैऱ्या, कैऱ्याला आला पाड, आंबा झाला ग्वाड.
आंब्याचा केला रस, जेवायला केली आरास, आराशीला काढली रांगोळी बसले जेवायला, साता जन्माचे सौभाग्य माझ्या भाळी.
मांडवाच्या दारी उभी होते सुवासिनीच्या मेळ्यात, नवरत्नाचा हार आहे आजीबाईच्या गळ्यात, मामंजीच्या मंदिलाला मोत्याचा तुरा, आत्याबाईच्या पोटाला जन्मला हिरा, परसदारी होती तुळस, तिथे सापडला कळस, पायी पैंजणी, भार कंबरी, कमरपट्ट्याचा गोफ, वर निऱ्याचा चोप, माझा बसायचा झोक, मला आलं हसू, मी हसले गालातल्या गालात, मला विचारलं रंग महालात, रंग महालाची हवा काय? -रंगीत पाट बसायला, दिल्लीचा आरसा पहायला, इतकं शहाणपण किती, पुण्याचा कारभार हाती, मातीच सोनं, सातताळ माडी, खाणला आड, लावलं रामफळाचं झाड, त्याला आले मोती…….. चं नाव घ्यायला अवघड किती.
झुल झुंबराचं, फुल उंबराचं, कडी ताकाची, वडी लाखाची, लेक कुणाची आई बापाची, सुन कुणाची सासू सासऱ्याची, राणी कुणाची भ्रताराची, नाजूक तेलच्या, साजूक पुऱ्या, चौरंग टाकले, टाकले पाट………. बसले पुजेला समया लावल्या तीनशे साठ.
कण-कण फुगली, मन-मन माती, उतरल्या भिंती चितरले खांब, आत्याबाईच्या पोटी जन्मले राम, राम गेले शेतात, शेतातून आणल्या करडी, करडीत झाल्या आरडी, आरडीचं केलं तेल, तेल ठेवलं शिक्यावर, शिक तुटलं, मडकं फुटलं, वगळ गेला परसदार, परसदाराचा पैका नाव कोण घेतं ऐका,नाव कोण घेती एक …….ची लेक, नाव कोण घेती गहीण ……..ची बहीण, नाव कोण घेती कंथनी…….. ची पुतणी,
नाव कोण घेती काशी ……..ची मावशी,
नाव कोण घेती तानी……….. रावांची राणी.
संक्रांतीच्या सणाचे उखाणे:-
नवीन वर्षाचं स्वागत केलं उत्साहाला आलं उधाण,…… नाव घ्यायला आज संक्रातीचं कारण.
भ्रमर करतो गुंजारव, मधाने भरतो पोळी,…… नाव घेते संक्रातीच्या हळदी कुंकवाच्या वेळी.
संक्रातीच्या सणाला करतात हलव्याचा साज,…….. मुळे झाले मी सौभाग्यवती आज.
अंबे जगन्माते वंदन करते तुला,……. नाव घेते संक्रातीच्या सणाला.
गोडी घ्यावी गुळापासून स्निग्धता घ्यावी तिळापासून, ……..चं नाव घेते आशिर्वाद द्यावा मनापासून.
संक्रातीच्या शुभदिनी तिळगुळ घ्या बोला गोड,…….. ची लाभली मला संसारात जोड.
संक्रातीच्या सणाला भरतात गाजर बोराने ओटी,……… चं नाव घेते खास तुमच्यासाठी.
स्नेहामधला मधुर गोडवा टिकावा वर्षभर,…….. चं नाव घेते पाळी आली वर.
संक्रातीच्या सणाला येतात नटून बायका,……. चं नाव घेते सर्वजण ऐका.
तिळगुळ घ्या गोड बोला, संक्रातीच्या शुभेच्छा देते गोडीनं,……. चं नाव घेते प्रेमभाव भक्तीनं.
संक्रातीच्या सणाला लागतात गाजर, बोरं, ऊस,……. बरोबर संसारात मी आहे खुश.
लग्नकार्यात किंवा इतर कार्यात घास भरवताना चे उखाणे
महादेवाच्या मंदिरात उदबत्तीचा/अगरबत्ती वास,…… ना भरवते…….(येथील रिकाम्या जागी एखाद्या पदार्थाचे नाव घ्या) चा घास.
गर्व नसावा पैशाचा अभिमान नसावा रुपाचा,…… ना घास भरवते ……(पदार्थाचे नाव घ्या)चा.
आनंदाने भरला हा दिन लग्नाचा,…….. ना घास देते गोड जिलेबीचा.
सुख-समाधान तेथे लक्ष्मीचा वास,…….. ना देते……(या ठिकाणी पदार्थाचा नाव घ्या) चा घास.
चांदीच्या तबकात पक्वानाची रास,…… ना देते…….. चा घास.
रंगीबेरंगी रांगोळ्यानी पंगतीला शोभा येते,…… चा घास ……….ना देते.
दया, क्षमा, शांती तेथे लक्ष्मीचा वास,…….. ना भरवते……. चा घास.
लाजऱ्या राधिकेला कन्हैया म्हणतो हास,……. घालते ………चा घास.
शरयू नदीत जन्म झाला मेघदूतांचा,…… ना घास घालते…….. चा.
संसाराच्या सुख-स्वप्नाची स्त्रीच्या मनी आस,……. ना घालते……….. चा घास.

नवरी सासरी आल्यानंतर गृहप्रवेशाच्या वेळी घ्यायचे उखाणे
जाई-जुईचा वेल पसरतो दाट,
……चे नाव घेते सोडा आता वाट.
सासर – माहेरच्या नातेवाईकांनी लग्नाचा केला थाट
……..चे नाव घेते सोडा आता वाट.
आलो वरातीन अन् मंडपातून,……..रावांचे नांव घेते सोडा आता दारातून.
सोडल माहेर मिळाली पतीची साथ,…….रावांचे घेते नाव जाऊ द्या आता घरात.
लग्न करून आले दारात,………चे नाव घेते जाऊ द्या आता घरात.
पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते, ……चं नाव घेऊन (रावांसह) गृहप्रवेश करते.
प्रीतीचा ठेवा प्राणपणाने जपते, …….चं नाव घेऊन (रावांसह) गृहप्रवेश करते.
अज्ञातवासात राहण्यासाठी पांडवानी बदलले वेश,…… चं नाव घेऊन (रावांसह) करते गृहप्रवेश.
तुळशीला घालते प्रदक्षिणा, विष्णूला करते नवस,……. चं नाव घेते गृहप्रवेशाच्या वेळेस.
नेत्राचे निरंजन लावावे संसाराच्या ताटी, चं नाव घेते गृहप्रवेशासाठी.
रामाने जन्म घेतला कौशल्येच्या पोटी, …….चं नाव घेते गृहप्रवेशासाठी.
साता समुद्राच्या पलीकडे राधा-कृष्णाचा खेळ,…… चं नाव घेते सायंकाळची वेळ किंवा गृहप्रवेशाची वेळ
आकाशाच्या अंगणात ब्रम्ह, विष्णू आणि महेश,….. चं नाव घेऊन करते गृहप्रवेश.
उंबरठ्यावरचे माप, पदस्पर्शाने लवंडते, ……..पत्नी म्हणून गृहप्रवेश करते.
उंबरठ्यावर पाय देताच लागली सुखी जीवनाची चाहूल, ……चं नाव घेऊन टाकते घरात पाऊल.
सुखाच्या पायऱ्या चढताना नाही दुःखाचा लवलेश, …….चं नाव घेऊन (रावांसह) करते गृह प्रवेश.
लक्ष्मी शोभते दाग दागिन्याने, विनयाने विद्या शोभते,……. बरोबर गृहप्रवेश करते.
मातृत्वाच्या मांगल्याने मन मोहित होते,…… चं नाव घेऊन (रावांसह) गृहप्रेवश करते.
बारशाच्या दिवशीचे घ्यायचे उखाणे:-
मोत्याची माळ सोन्याचा साज,………… च्या मुळे आई झाले आज.
शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी, ………नाव घेते बाळाच्या बारशादिवशी.
पंचम सूर म्हणजे संगिताचा साज,……….. रावांच्या बाळाचं बारसं आज.
हिऱ्याच्या कंठ्याला, मोत्याचा घाट……… च्या बाळाचा बारशाचा थाट.
जीवनात ही घडी अशीच राहू दे ,………चे प्रीतीफूल असेच उसू दे.
फुलांच्या सोडल्या माळा, जागोजागी लावले आरसे,…….. च्या बाळाचे आज बारसे.
गुलाबाचा ताटवा लतांचा कुंज,…….. च्या बाळाची आज आहे मौज.

गोकूळात आला कृष्ण सर्वांना झाला हर्ष,……. च्या बाळाचं आज आहे बारसं.
दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र,……….. मुळे मला मिळाले मातेचं मानपत्र.
संसाराच्या वेलीवर फुलले नवे फूल,………. च्या बाळाची सर्वांना लागली चाहूल.
मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा, ……….च्या वंशात आला दीप नवा.
थोर कुळात जन्मले, सुसंस्कारात वाढले,……… च्या मुळे आई आज झाले.